रात्रशाळा बंद पडणार, शासनाचा नवा निर्णय ,
राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेची मा. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शासन निर्णय मागे घेण्याची मागणी.
मुंबईतल्या कष्टकरी विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या रात्रशाळा नव्या शैक्षणिक वर्षातच बंद पाडण्याची व्यवस्था शासनाच्या नव्या निर्णयाने (जीआरने) केली आहे. सुमारे १५० वर्षांची रात्रशाळांची परंपरा चालवणारे अनुभवी शिक्षक आता रात्रशाळेत शिकवू शकणार नाहीत. दिनांक १७ मे २०१७ रोजी हा निर्णय जारी करण्यात आला.
राज्यातील १७६ रात्रशाळा व रात्र ज्युनिअर कॉलेज यामध्ये दिवसाच्या शाळेतील १०१० अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक रात्री अर्धवेळ अध्यापनाचे काम करतात. त्या सर्वांना या शासन घरचा रस्ता दाखवला आहे.
दिनांक १७ मे २०१७ च्या शासन निर्णयामध्ये रात्रशाळांसाठी दिवस शाळांसारखे कठोर निकष लावण्यात आले असून माध्यमिक शाळा संहितेमध्ये दिलेल्या सगळ्या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. २८ ऑगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार नवे निकष ठरवण्यात आले असून विद्यार्थी संख्या व शिक्षकांची संच मान्यता यासाठी रात्रशाळांसाठी असलेली विशेष सवलतही काढून घेण्यात आली आहे.
मुंबई रात्र शाळा अध्यक्ष, प्रा. वसंत भागवत यांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. महात्मा फुले आणि मुंबईतली मिशनरी ब्रॅडले मॅडम यांनी चालू केलेल्या रात्रशाळा शासनाच्या या नव्या निर्णयाने मोडून पडणार आहेत.
समाजातील दुर्बल व गरजू घटकांतील विदयार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी रात्र शाळा अत्यंत अावश्यक अाहेत. रात्र शाळांची परंपरा कायम ठेवण्याकरिता रात्र शाळांसाठीचा दिनांक १७ मे २०१७ चा शासन निर्णय रद्द करण्यासाठीचा लढा लढावा लागेल असे संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मनोहर कदम यांनी सांगितले.
Comments
Post a Comment