संपूर्ण राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तरांच्या मासिक देय वेतन व भत्त्यांचे प्रदान राष्ट्रीयकृत बॅंकेमार्फत करण्याची कार्यपध्दती व त्यातून तयार झालेला श्रेयवाद अन् राजकारण..!

मुंबई शहरात एप्रिल २००१ पासून शासकिय कर्मचार्‍यांना त्यांच्या मासिक वेतनाचे प्रदान बॅंकेमार्फत वितरित करण्याची सुधारित पध्दत अंमलात अाली. दिनांक १ जून २००५ पासून केंद्रशासनाकडून रोख रक्कम काढण्यावर Banking Cash Transation Tax हा नविन कर अाकारण्यात अाल्यामुळे मुंबईप्रमाणेच महाराष्ट्रतील सर्व जिल्ह्यांतील कर्मचार्‍यांना बॅंकेमार्फत मासिक वेतन व भत्ते प्रदान करणे अनिवार्य झाले. शासन स्तरावर प्रथम मुंबई येथे सुधारणा करण्यात अाली. तसेच ही योजना कर्मचारीभिमुख करण्याचा मुलभूत उद्देश लक्षात घेता बॅंकांशी सुधारीत अटी व शर्ती निर्धारित करुन बॅंकांवर अधिक जबाबदारी टाकण्यात अाली.  या धर्तीवर दिनांक २९ अाॅगस्ट २००५ रोजी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने शासन निर्णय (G R) पारित केला. संपूर्ण महाराष्ट्रात बॅंकेमार्फत वेतन वितरण योजनेत सामिल होण्यासाठी शासनाशी करार केलेल्या १४ बॅंकांची सूची शासन निर्णयातील सूची जोडपत्र - एक मध्ये नमूदही केलेली अाहे. या धर्तीवर राष्ट्रीयकृत बॅंकांमार्फत मासिक देय वेतन व भत्ते देण्याची सुरुवात झाली. या बाबीचे श्रेय कोणी घ्यावे , कशे घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्नच !

बृहन्मुंबई खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान युनियन बॅंक अाॅफ इंडिया या राष्ट्रीयकृत बॅंकेमार्फत करण्याबाबतचा शासन निर्णय (G R) दिनांक ५ अाक्टोबर २०११ रोजी पारित झाला. त्याचे कारण असे की , राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेत्तरांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान यापूर्वी सहकारी बॅंकेमार्फत होत असताना संबधित बॅंकांना शेकडा २० पैसे इतके व्यवस्थापन शुल्क विहित केले होते. परंतु तत्कालीन स्थितीमध्ये काही राष्ट्रीयकृत व काही खाजगी बॅंका कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क न घेता, वेतन व भत्ते अदा करण्यास तयार झाल्यामुळे खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांमधील कर्मचार्‍यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान "युनियन बॅंक अाॅफ इंडिया " या बॅंकेमार्फत करण्यास तत्कालिन शासनाने मान्यता दिली. सदरच्या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक १ नोव्हेंबर २०११ पासून सुरु करण्यात अाली. विशेष बाब म्हणजे याच कालखंडात दिनांक १८ अाक्टोबर २०११ रोजी बीड जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान " स्टेट बॅं अाॅफ हैद्राबाद " बीड या राष्ट्रीयकृत बॅंकेमार्फत करण्याचा शासन निर्णय (G R) पारित झाला. खर्‍या अर्थाने प्राथमिक विभागाला ना मतदान , ना शिक्षक अामदार , मग हे श्रेय कोणाचे ?

नियमितपणे एक तारखेचा पगार न चुकता करणार्‍या राष्ट्रीयकृत बॅंकेने मात्र प्लॅनमधिल शाळांतील शिक्षक शिक्षकेत्तरांचे पगार निधी अभावी एक तारखेला बॅंकेचा निधी वापरुन पगार कधीच केले नाहीत. शिक्षकांच्या प्रतिनिधींना हे दिसले का नाही ? प्लॅनमधिल कर्मचार्‍यांना चार-चार महिने पगार निधी अभावी पगार मिळत नसल्यामुळे असंख्य मरण यातनांचा व अर्थिक संकटांचा सामना करावा लागला. कारण प्लॅनमधिल शिक्षकांची संख्या कमी होती त्यामुळे मतांच्या समीकरणावर त्याचा फारसा फरक पडणार नसेल म्हणुनच ! माझा अाक्षेप राष्ट्रीयकृत बॅंकांवर अजीबात नाही. परंतु श्रेय घेणार्‍यांवर अाहे. निधीच्या उपलब्धतेशिवाय प्लॅनमधील शिक्षक शिक्षकेत्तरांचे वेतन एक तारखेस कधीच झाले नाही. राज्य अर्थसंकल्पानुसार नाॅनप्लॅन साठीचा  (ज्यांचा पगार नियमित १ ताखेस होत असे , असे बहुसंख्य शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ) संपुर्ण वर्षभराचा  वेतन निधी उपलब्ध असतो , त्यामुळे एक तारखेला पगार होणे कधीच अडचणीचे झाले नाही. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रीयकृत बॅंकेमध्येच कर्मचार्‍यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान झाले पाहिजे.

राज्यातील अनेक जिल्हा बॅंका अडचणीत असताना तेथिल कर्मचार्‍यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान वेळेवर होत नाहीत.नाशिकची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक वेळेवर वेतन व भत्ते प्रदान करत नाही यासाठी नाशिक जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांतील कर्मचार्‍यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान अायडीबीअाय (IDBI) बॅंकेमार्फत करण्याचा शासन निर्णय दिनांक १४ जून २०१७ रोजी पारित झाला. कमालीचा विरोधाभास असणारे शासन निर्णय फक्त अाणि फक्त शिक्षकांच्या पगाराबाबत या शासनाकडून निर्गमित होतात. शासन यातून काय साधू इच्छिते ?  असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडणे स्वभाविक अाहे.  तसेच १४ जून २०१७ रोजी पुन्हा ठाणे जिल्यासाठी , ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते टिजेएसबी (TJSB) सहकारी बॅंकेमार्फतच अदा करण्याचा शासन निर्णय (GR) पारित केला. ठाणे जिल्हा भूभाग विस्ताराने प्रचंड मोठा अाहे, त्यामुळे तेथिल शिक्षक शिक्षकेत्तर (ग्रामीण भागातील) अर्थिक व्यवहारांसाठी अडचणीच येतील.

एकंदरीत वरील सर्व शासन निर्णयांचे अवलोकन केल्यास या शासनाने शिक्षक शिक्षकेत्तरांच्या वेतन व भत्त्ते प्रदान करण्याबाबत चे धोरण निश्चित नाही. कोणत्या राजकीय हेतुने हे सर्व निर्णय घेतले जातात हे येणारा काळच ठरवेल.

मात्र राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते एकाच राष्ट्रीयकृत बॅंकेमार्फत प्रत्येक महिन्याच्या एक तारखेलाच अदा व्हावे. ते शक्य अाहे कारण अर्थसंकल्पानुसार वेतन हे  अनिवार्य खर्चामध्ये मूळ अस्थापनाविषयक खर्च - वेतन निवृत्ती वेतन , व्याज प्रदाने या विषयांचा दि २७ जानेवारी २०१७ रोजीच्या शासन निर्णय पारित झालेला अाहे.त्यामुळे वेतन निधी नियमितच उपलब्ध होईल. एकच शासन निर्णय जारी करून एकाच राष्ट्रीयकृत बॅंकेतुन एकाच वेळी राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन व भत्ते प्रदान व्हावे. शासन असे करेल हिच अपेक्षा !

Comments