राज्यातील अल्पसंख्यांक संस्थेतील अतिरीक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांच्या समावेशनाबाबत. (No Work No Pay)
दिनांक १३ जुलै २०१६ व २७ अाॅक्टोबर २०१६ नुसार राज्यातील अल्पसंख्यांक संस्थेतील अतिरीक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांना सेवेत सामावून घेण्याची कार्यपध्दती विहित केली अाहे. राज्यातील अल्पसंख्यांक संस्थेतील अतिरीक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांचे समायोजन कार्यवाही करत असताना अतिरीक्त ठरलेल्या ज्या कर्मचार्यांचे समायोजन होणार नाही त्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांना विनाकाम विनावेतन (No Work No Pay) या तत्वाच्या अाधारे वेतन अदा करण्यात येऊ नये असे अादेशित करण्यात अाले अाहेत.
शासनाच्या वरील धोरणाची अंमलबजावणी सुरु झाल्यामुळे अल्पसंख्यांक संस्थेतील सुमारे पाच हजार शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांच्या कायम सेवा धोक्यात अालल्या असून त्यांच्या उपजिवीकेचे एकमेव साधन सर्व कायदे डावलून हिसकावून घेतले अाहे. शासन धोरणाची अंमलबजावणी अंतर्गत अन्य अल्पसंख्यांक संस्थेतील रिक्त जागांवर अशा अतिरीक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांना समायोजन करुन घेण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. तसेच कोणताही अाॅनलाईन कॅम्प अायोजित केलेला नाही. अन्य अल्पसंख्यांक संस्थेत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेत सामावून घेण्याचा कोणताही प्रयत्न करण्यापूर्वी अशा अतिरीक्त कर्मचार्यांचे शासन वेतन बंद करुन स्वत:चे अादेश पायदळी तुडवून शासनाची प्रतिमा मलिन होत अाहे.
राज्यातील अल्पसंख्यांक संस्थेतील अतिरीक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांना विनाकाम विनावेतन (No Work No Pay) धोरण रद्द करण्याचे शुध्दीपत्रक काढणेबाबत राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेने दिनांक १९ अाॅक्टोबर २०१६ रोजी मा. शिक्षण मंत्री व मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांच्याशी पत्रव्यवहार केला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या दिनांक १७ अाॅक्टोबर २०१६ च्या शासन शुध्दीपत्रकामध्ये मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र.५२८९/२०१६ व ९२५६/२०१६ नुसार विनाकाम विनावेतन (No Work No Pay) हे धोरण १ अाॅक्टोबर २०१६ रोजी रद्द केले. मा. उच्च न्यायालयाने अतिरीक्त शिक्षक/शिक्षकेतरांचे वेतन त्यांचे समायोजन होईपर्यंत सुरुच राहील असा निर्णय मा. उच्च न्यायालयाने दिला.
वरील संदर्भीय बाबीनुसार शालेय शिक्षण विभागही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाप्रमाणेच निर्णय घेईल म्हणुनच राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेने पत्रव्यवहार केला परंतु दिनांक २७ अाॅक्टोबर २०१६ रोजी शालेय शिक्षण विभागाने शुध्दीपत्रक काढत अंशत: बदल केला. त्या बदलाप्रमाणे शासकीय पातळीवर कार्यवाही सुध्दा झालेली नाही. ही खेदाची बाब अाहे.
अल्पसंख्यांक संस्थेतील कर्मचार्यांवर घोंघावणारे सदरील संकट अल्पसंख्यांक संस्थावरील शासनाच्या क्रोधाचा , असुयेचा व खदखदणार्या असंतोषाचा परिपाक अाहे. हे खालील तथ्यावरुन दिसून येते.
१) अल्यसंख्यांक संस्थेतील अतिरीक्त कर्मचारी सेवेत कायम अाहेत अाणि त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवाशर्ती नियमावली , १९८१ मधील नियम २६ व २७ प्रमाणे सेवा सातत्याचे संरक्षण लाभले अाहे.
२) वरील नियम २६ व २७ नुसार असे अतिरीक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी अन्य संस्थेत सामावून घेण्यास पात्र अाहेत. अन्यत्र सामावून घेण्यास ते या नियमानुसारच हक्कप्राप्त ठरतात.
३) तसेच वरील नियमानुसारच सदर अतिरीक्त कर्मचारी अन्यत्र समायोजन होईपर्यंत त्यांच्या मूळ शाळेतून वेतन मिळण्यास पात्र अाहेत. वेतनावर त्यांचा हक्क अबाधित अाहे.
४) अल्पसंख्यांक संस्थांना राज्य घटनेच्या कलम ३० नुसार विशेष हक्क प्राप्त झाले अाहेत. मा.सर्वोच्च न्यायालयाचे अादेश दि. ३१ अाॅक्टोबर २००२ नुसार अल्पसंख्यांक संस्थांच्या विशेष अधिकारावर शिक्का मोर्तब झाला अाहे.
५) बिगर अल्पसंख्यांक संस्थेतील कायम शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांना ते अतिरीक्त ठरल्यास त्यांना समायोजीत केले जाते व समायोजीत होईपर्यंत त्यांचे वेतन त्यांना अदा करण्यात येते.
६) अल्पसंख्यांक संस्थांना राज्य घटनेने विशेष दर्जा बहाल केला असताना तेथील शिक्षकांना सामान्य संस्थेतील शिक्षकांना मिळणार्या सवलती कशा नाकारता येतील ? विशेष संस्थेतील शिक्षकांना सर्वसामान्य संस्थेतील शिक्षकांपेक्षा अधिकच्या सवलती मिळणे तर्कसंगत ठरु शकते. परंतु सर्वसामान्य संस्थेतील सवलती/तरतुदी अल्पसंख्यांक संस्थेतील कायम शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांना नाकारणे अन्यायमूलक व अनाकलनीय अाहेत.
७) शासनाची सदरील भेदभावाची निती घटनेच्या कलम १४ ला छेद देणारी अाहे. दोन वेगवेगळ्या प्रकारातील संस्थातील समान शर्तीधारक शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेमध्ये भेदभाव करणारा शासन निर्णय घटनेच्या कलम १४ चा उपमर्द करत नाही काय ?
बालकांच्या सर्वंकष जडणघडणीच्या पवित्र कार्याचे जोखड वाहणार्या शिक्षकांच्या जिवनाशी खेळणारा १३ जुलै २०१६ चा शासन निर्णयातील विनाकाम विनावेतन (No Work No Pay) हे तत्व रद्द करुन अल्पसंख्यांक संस्थेतील कायम शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांच्या सेवेला हे शासन बिनशर्त संरक्षण देईल हीच अापेक्षा !
Comments
Post a Comment