दिव्यांग (स्पेशल स्कूल) शाळांबाबत सरकारी धोरणातून अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित विषयांना बगल, मतांच्या राजकारणासाठी अाश्वासने व घोषणांचा फार्श! १३१४ शाळा बंद करण्याचा राज्य शासनाचा अधोगामी, अात्मघातकी निर्णय!
दिव्यांग मुलांमुलींसाठी असणार्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना नियमित वेतन मिळत नाही. त्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना प्रचंड अार्थिक संकटांचा सामना करावा लागत अाहे. कर्मचार्यांना विम्याचे हप्ते , गृहकर्जाचे हप्ते , वैयक्तिक कर्जाचे हप्ते वेळेवर भरु न शकल्यामुळे दंडात्मक रकमेचा भुर्दंड नाहक भरावा लागत अाहे. अामचे पदवीधरांचे व शिक्षकांचे प्रतिनिधी ह्या समस्या दहा-बारा वर्षांपासून सोडवू शकले नाही. ही खरी शोकांतिका!
दहा-बारा वर्षे झाली पण ही समस्या सुटली नाही. अगोदरचे अाघाडीचे सरकार व अाताचे युतीचे सरकार येऊनही फक्त अाश्वासनांशिवाय काहीही बदल झाला नाही. फक्त बैठका , चर्चा , (निवडणुका जवळ अाल्यावर) यांचेच फार्श झाले. अाश्वासने देवून मतांचा जोगवाही मिळविला. परंतु दहा-बारा वर्षात नियमित वेतन वेळेवर येण्यासाठीचा नविन लेखाशिर्ष व संदर्भित पाठपुरवठा करण्यास शिक्षकांचे प्रतिनिधी अयशस्वी ठरले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सन्मानीय मंत्री महोदयांनी शिक्षक प्रतिनिधींच्या बैठकीत घोषणा केली, की दिव्यांग मुलांमुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक माध्यमिक शाळा , ज्युनिअर काॅलेज सुरु करणार अाहे . येथे नियमित वेतनाचा पत्ता नाही परंतु नविन घोषणाच! तीही नवीन शाळा सुरु करण्याची!!
दिवाळी किंवा इतर मोठ्या सणांच्या काळात सर्वांना अागामी वेतन मिळते. परंतु विशेष शाळांतील शिक्षक शिक्षकेतरांचे नियमित पगार सुध्दा सणासुदिला वेळेवर अदा होत नाहीत. एक तारखेच्या नियमित पगार सुरु केल्याचा टाहो फोडणार्या सर्वांनीच विशेष शाळा व प्लॅन शाळांचा पगार कधीच वेळेत (तीन-तीन महिने विलंबाने) न झाल्याचेही लक्षात घ्यावे. एक तारखेचा पगार हे मुंबईतील विशेष शाळेतील शिक्षकांचे स्वप्न , स्वप्नच राहीले. अाश्वासन हवेतच विरले.खरे तर मुंबईतील पदवीधर व शिक्षक मतदार संघांच्या होऊ घातलेल्या अागामी निवडणुकांमुळे हा विषय ऐरणीवर अाला अाहे. शिक्षक सुज्ञ झाले अाहेत. सरकारी धोरण व त्यामागील राजकारण हे सर्वजण जाणतात.
सामाजिक न्याय विभागाने शाळा सुरु करण्याची घोषणा करताच , शालेय शिक्षण विभागाने १३१४ शाळा बंद करण्याची घोषणा केली. शिक्षण क्षेत्रातील हा कमालीचा विरोधाभास अाहे. कोणतीही शाळा बंद करणे, हा अात्मघातकी निर्णय अाहे. १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय दुटप्पीपणाचा अाहे. संविधानाच्या कलम - २१ मध्ये शिक्षणाचा मुलभूत हक्क करताना ६ ते १४ वयोगटातील बालकांना शिक्षण अनिवार्य करायचे अन दुसर्या बाजूला त्यांना शाळांपासून वंचित करायचे . ही लाजिरवाणी बाब अाहे. घरांपासून शाळा दूर गेल्या तर त्याचा परिणाम लहान मुलांच्या शिक्षणावर नक्कीच होणार अाहे. केंद्राने विद्यांजली उपक्रम राबवायचे अाणि राज्याने देशाचे भविष्य असणार्या मुलांना शिक्षणापासून वंचित करायचे म्हणजे अधोगामी , अात्मघातकीच अाहे!
Comments
Post a Comment