अनुदानासाठी १५ जानेवारी पासून अाझाद मैदानावर शिक्षक शिक्षकेतरांचे अांदोलन सुरुच ! शिक्षणमंत्री व वित्त विभाग यांचे मागण्यांकडे दुर्लक्ष.

सोमवार दिनांक १५ जानेवारी २०१८ पासून अाझाद मैदानावर प्रचलित नियमानुसार अनुदान मिळण्यासाठी अांदोलन सुरु अाहे. राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेचा या अांदोलनास सक्रिय पाठींबा अाहे.   शालेय शिक्षण विभागाकडून मागील तीन वर्षांत  १६२८ शाळांना १०० टक्के अनुदानास पात्र असूनही फक्त २० टक्के अनुदान दिले. दरम्यानच्या काळात अनुदानासाठी अनेक शिक्षक बांधवांना प्राण त्यागावा लागला. शिक्षण क्षेत्राला खर्‍या अर्थाने काळींबा लागला.

माझे मित्र मुप्टा शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मा. श्री गजानन खैरे सर यांची अाज अाझाद मैदानात उपोषण स्थळी भेट घेतली. १ व २ जुलैच्या घोषितच्या सोबत अघोषित शाळांच्या निधिचा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी खैरे सरांचे  जलत्याग व अन्नत्याग उपोषण सुरुच अाहे. मुळत: या सरकारची अनुदान देण्याची नियतच दिसत नाही. सरकारचा निषेध!

संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष , श्री. मनोहर कदम यांनी सरकारी ध्येय धोरण व अनुदान नितीवर सडकून टिका केली. राज्य संघटक व रात्रशाळा समन्वयक भानुदास शिंदे , मुंबंई संघटक व्यंकट गायकवाड , मुंबई उपाध्यक्ष सुधिर वर्‍हाडी , दक्षिण मुंबई अध्यक्ष गणेश झगडे तसेच मुंबईतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी सक्रिय सहभाग घेतला.

मुंबई मनपा खाजगी शाळा समन्वय समिती अध्यक्ष मा. श्री. मनोहर सुर्वे सरांनीही सर्वांना मार्गदर्शन करत चुकीच्या सरकारी धोरणावर टिका केली. मुंबई राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला अध्यक्षा , मा. सौ. चित्राताई वाघ यांनीही सरकारवर टिका करत अांदोलनास पाठिंबा दर्शविला.

सरकारची धोरणे व नोकरशाहीची वाढलेली दंडेलशाही यात फसलेला शिक्षणाचा कारभार , पोटाला चिमटा काढून मागील १५ - २० वर्षांपासून अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेले असंख्य शिक्षक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या अाशेने शासनाच्या अनुदान ध्येय धोरणांकडे डोळे लावून बसले अाहे. याची वेळीच दखल घेतली नाही तर ,  यावर मोठा अाक्रोश निर्माण होणे स्वभाविक अाहे. येत्या कळात याची किंमत सरकारला नक्कीच मोजावी लागेल.

Comments