आजही शिक्षकांच्या समस्या कायम...!
मुख्याध्यापिका स्वर्गीय सौ. संध्या सुबोध खवणेकर मॅडम (स्वामी शामानंद हायस्कूल , घाटकोपर) यांचा आज 26 ऑक्टोबर रोजी स्मृतीदिन ! स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !! खवणेकर मॅडम यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. विचित्र व्यवस्थेने त्यांचा बळी घेतला. आजही शिक्षण क्षेत्रात शिक्षक शिक्षकेत्तर बंधु भगिनी वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त आहेत. अनुदानित खाजगी शाळांमध्ये आजही शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आजही अनेक संस्थाचालक शिक्षकांचे लचके तोडत आहेत.
मुंबईसह राज्यामध्ये अनेक ठिकाणी अाजही अशा अनेक घटना घडत असतील , परंतु त्या समोर येत नाहीत. अनेक अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांना वेठीस धरून संस्थाचालक अर्थार्जनासाठी खाजगी शिकवणी वर्ग अनाधिकृतपणे शाळेमध्ये शिक्षकांमार्फत चालवून शिक्षकांना वेठीस धरले जात आहे.
माध्यमिक शाळा संहितेनुसार वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्राप्त शिक्षकांना संस्थेच्या अर्थ हितासाठी वेतनश्रेणी देयके , फरकाची देयके मुद्दाम अडवून ठेवण्यासारखे प्रकारही घडतात. अनुदानित खासगी शाळेतील कर्मचाऱ्यास संस्थेच्या विनाअनुदनित किंवा इतर विनानुदानित माध्यमांच्या शाळांवर राबवून घेण्याचे दुष्कर्म अनेक संस्थाचालक अर्थ हितासाठी राजरोसपणे करतात. परिणामी संचमान्यतेनुसार शिल्लक असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजाही पडतो. यामध्ये अधिकची भर म्हणजे संस्थेचे पदाधिकारी , नातेवाईक , मर्जीतील कर्मचारी हेही नियमितपणे कर्तव्य काळ पूर्ण करत नसल्याने त्यांचाही अतिरिक्त भार नियमित शिक्षकांवर पडत असतो . जर अशा संस्थांमध्ये संचमान्यतेनुसार मंजूर पदाप्रमाणे कर्मचारी कर्तव्य काल पूर्ण करत नसतील , अतिरिक्त कामाचा बोजा पडत असेल तर कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या पाहिजेत , अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. काही शैक्षणिक संस्था आम्हाला शाळा चालविण्यास परवडत नाही या नावाखाली कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक (वर्गणी स्वरूपात) करतात.
प्रामाणिक पणे कष्ट करणार्या शाळा संस्था उभी करणाऱ्या वरिष्ठ शिक्षकांना नियम डावलून संस्थेच्या लोकांना अभय देऊन सेवा ज्येष्ठ शिक्षकांना अतिरिक्त करण्याचे काम काही संस्थांमध्ये होते. अशा प्रकारे अन्याय होत असेल तर आक्षेप नोंदवून, तक्रार करून अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे. नाही तर असे प्रकार घडतच राहतील. जर संस्थाचालकच मुख्याध्यापक असेल तर मग शिक्षकांना नाहक त्रास देणे, छळ करणे , आर्थिक पिळवणूक करणे हे प्रकार जास्तच घडतात.
नवनीत प्रकाशनाच्या किंवा इतर प्रकाशनाच्या व्यवसाय पुस्तिका शिक्षकांमार्फत जबरदस्तीने विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेण्याचे काम शिक्षकांकडून जबरदस्तीने करून घेतले जाते. कारण यामागेही अर्थकारण! व्यवसाय पुस्तिका विक्रीतून 15 ते 20 टक्के विक्री किमतीवर सूट मिळून संस्था आर्थिक लाभ करतात. म्हणून त्यासाठी शिक्षकांना वेठीस धरतात. पाठ्यपुस्तक व्येतीरिक्त हे अतिरिक्त चे व्यवसाय नाकारून शिक्षकांनी याविरोधात तक्रार करून आवाज उठविला पाहिजे. सर्वच संस्था अशा आहेत असे नाही. काही शैक्षणिक संस्था अतिशय उत्कृष्टपणे शैक्षणिक कार्य पार पाडत आहेत. परंतु ज्या शैक्षणिक संस्था शिक्षकांचे आर्थिक मानसिक पिळवणूक करत असतील तर त्यांच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. अन्याय दूर केला पाहिजे.
खवणेकर मॅडम यांचा मानसिक , आर्थिक छळ झाला. आजही अनेक समस्या व संकटांनी शिक्षक शिक्षकेतर हैराण आहेत. पुन्हा कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणताही त्रास होऊ नये. यासाठी आपण सर्व एकत्रितपणे लढू या ! हीच खरी एकात्मतेची खवणेकर मॅडम यांना श्रद्धांजली !!
लढा स्वाभिमानासाठी !
लढा हक्कासाठी !!
लढा भविष्यासाठी !!!
Comments
Post a Comment