संगणकधारित शिक्षण काळाची गरज असल्याने राज्यातील 8000 संगणक शिक्षक / निर्देशक यांना शालेय शिक्षण विभागाने सामावून घ्यावे.
संगणकधारित शिक्षण काळाची गरज असल्याने राज्यातील 8000 संगणक शिक्षक / निर्देशक यांना शालेय शिक्षण विभागाने सामावून घ्यावे.
21 व्या शतकातील आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी संगणक ज्ञानाची नितांत गरज आहे. त्यामुळे संगणकधारित शिक्षण ही काळाची गरज आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान देण्यासाठी तज्ज्ञ व प्रशिक्षित संगणक शिक्षकांची गरज ओळखून महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने दिनांक 15 डिसेंबर 2018 रोजी शासकीय आश्रमशाळांमध्ये संगणक शिक्षक / निर्देशक हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबतचा शासन निर्णय पारीत केला. त्यामध्ये संगणक शिक्षक / निर्देशक पदासाठी प्रतिमाह रुपये वीस हजार इतके एकत्रित मानधन देय राहील. या शासन निर्णयानुसार राज्यात शासकीय आश्रम शाळांमध्ये संगणक शिक्षक पदे भरण्यात आली.
शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी दिनांक 23 जानेवारी 2019 रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव यांना पत्र दिले. त्यामध्ये शालेय शिक्षण विभागाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात 500 दुसऱ्या टप्प्यात 2500 व तिस-या टप्प्यात 5000 शाळांतील 8000 संगणक शिक्षकांच्या नियुक्तीबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आपले धोरण त्वरित जाहीर करण्याबाबत मार्गदर्शन मागविले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे उपसचिव यांनी दिनांक 10 एप्रिल 2019 व 26 सप्टेंबर 2019 ही दोन पत्रे शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना दिली. या दोन पत्रांद्वारे असे कळवले की संगणक शिक्षक / निर्देशक यांची नियुक्ती व वेतन निश्चिती करण्यासंबंधी केंद्राचे कोणते धोरण नसून राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावेत. राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शिक्षकांनी अनेक आंदोलनेही केली. परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे संगणक शिक्षकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
शालेय शिक्षण विभागाने दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी राज्य प्रकल्प संचालक , समग्र शिक्षा , मुंबई यांना मानव संसाधन विकास मंत्रालय , नवी दिल्ली यांच्या दिनांक 26 सप्टेंबर 2019 च्या पत्रानुसार शासनाच्या प्रचलित धोरणानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले आहे. ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने शासन निर्णय क्र. शाअाशा - 2018 / प्र. क्र. 489 / का.13 या शासन निर्णयानुसार संगणक शिक्षक पद कंत्राटी पद्धतीने भरली आहेत. त्या अर्थी शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय पारीत करून 8000 संगणक शिक्षक / निर्देशक पदे भरणे अनिवार्य व अत्यावश्यक आहे.
शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी राज्यभरात व्हर्च्युअल क्लासरूम उभारण्याचा निर्णय नवीन मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याबद्दल ठाकरे सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन! डिजिटल क्लासरूम उभारणे. तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी ई-लर्निंगवर भर देण्याबाबत आघाडी सरकार आग्रही आहे. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी संगणकीय शिक्षण अत्यावश्यक झाले आहे. त्यासाठी संगणक शिक्षक /निर्देशक यांच्या नियुक्त्या करणे अत्यावश्यक आहे. म्हणून राज्यातील 8000 संगणक शिक्षक / निर्देशक यांना वेतन देणे आवश्यक आहे. लवकरच या संदर्भात शासन निर्णय पारित होऊन शैक्षणिक क्षेत्रातील संगणकीय शिक्षणातील हा बदल नक्कीच होईल याची मला खात्री आहे.
संगणक शिक्षक शाळेत असणे गरजेचे आहे.
ReplyDeleteICT cha vijay aso
ReplyDelete