एक शैक्षणिक तारा निखळला!

एक शैक्षणिक तारा निखळला !

प्रशांत रेडीज सर हे मुंबईसह महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील अत्यंत नावाजलेले नाव ! विनाअनुदानित बांधवांसाठी शासनाशी संघर्षमय लढा देत त्यांनी शिक्षण क्षेत्राला भरीव योगदान दिले आहे. मुंबईतील मुख्याध्यापकांचे एक सक्षम नेतृत्व ही त्यांनी केले. विद्यार्थी , पालक , मुख्याध्यापक ,  शिक्षक , शिक्षकेतर या सर्वांच्या न्याय हक्कासाठी अविरत लढणारा शिक्षक नेता म्हणजे प्रशांत सर ! सरांच्या अकाली अचानक जाण्यानं संपूर्ण शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कांदिवली येथील हिल्डा कॅस्टीलीनो हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून विनाअनुदानित तत्वावर सेवा कार्य करत असताना मुख्याध्यापकांच्या समस्यांसाठी तसेच विनाअनुदानित यांच्या अनुदानासाठी लढणारे प्रशांत सर म्हणजे शिक्षण क्षेत्रातील एक आधारवड ! मुंबई माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे चालते-बोलते कार्यालय म्हणजे प्रशांत सर ! निर्भीड , रोखठोक , शासनाची दोन हात करण्याची नेहमी हिम्मत ठेवणारा असाच दमदार शिक्षक मित्र आज आपल्यात नाही हे मन मानायला तयारच होत नाही. मनिष गावंडे ,खंडेराव जगदाळे,  के. पी. पाटील , बाळकृष्ण गावंडे , संजय डावरे  यांच्या सोबत आझाद मैदानावर अनेक वेळा एकत्र येऊन प्रचलित नियमानुसार अनुदान मिळाले पाहिजे यासाठी आग्रही भूमिका घेणारा सच्चा शिक्षक नेता म्हणजे प्रशांत सर !

आठवणींचा काहूर मनात दाटला अन्  २०१६ चा प्रसंग डोळ्यासमोर दिसू लागला. गणेशोत्सवाच्या काळात माझ्याघरी येण्यासाठी प्रशांत सर निघाले आणि वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. कुर्ला ते सायन च्या दरम्यान खूप पाणी साचले होते. सर त्या रस्त्याने येत असताना त्यांच्या कार मध्ये पाणी भरले व कार बंद पडली. त्या पाण्यातून ते ब्रिजवर येउन उभे राहिले. रात्री उशिरापर्यंत ते ब्रिज वरच  उभे होते.  मी तुम्हांला घेण्यासाठी तिकडे येऊ का ? असे फोनवर विचारले तेव्हा ते म्हणाले आंम्ही ब्रिज वर सुखरूप आहोत तुम्ही घराबाहेर पडू नका ! पाणी खूप भरले आहे. अतिशय हुशार, परोपकारी, मैत्री जपणारा दिलदार स्वभावाचा व्यक्ती आज आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही.

संघटनात्मक कामावरची त्यांची निष्ठा ओतप्रोत होती. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सरांचे भरीव असे योगदान होते. अनेक आंदोलनांच्या लाठ्या-काठ्या निधड्या छातीवर झेलणाऱ्या वाघाचे शैक्षणिक कार्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला प्रेरणादायी राहील. आता संवाद जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर सर तुमची आठवण येत राहील. अश्रू भरीत नयनांनी , जड अंत:करणाने , अमिट वेदनेसहित सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

शोकाकुल:- ज्ञानदेव हांडे (राज्य कार्याध्यक्ष), 
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना.

Comments