"अधुनिक काळातील प्रयोगशील गुरुंची गुरुपौर्णिमा"
आपल्या देशात गुरु-शिष्य परंपरा फार प्राचीन आहे. पुर्वी अश्रमात जावून गुरुगृही शिक्षण घेतले जात. नंतर शाळा , महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्यांनी एकत्र येवून अध्ययन-अध्यापनास सुरुवात झाली. आता कोविडच्या काळात गुरु घरुनच ऑनलाइन शिक्षण देतात व विद्यार्थी घरबसल्याच ऑनलाइन शिक्षण पद्धतीने शिक्षण घेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत गुरुच आपल्याला अज्ञानातून बाहेर काढतात. शिक्षक हेच आपले खरे गुरु आहेत. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी " शिक्षक दिन " साजरा करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. " गुरु " या शब्दाचा अर्थ " गु " म्हणजे अंधकार आणि " रु " म्हणजे नाहीसा करणे. जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून जीवन कसे जगावे हे आपल्याला गुरुच शिकवतात. मनुष्याच्या जीवनात तीन गुरु असतात. आई-वडील हे आपले पहिले गुरु. आपल्याला अनेक गोष्टी शिकून सर्वांगाने परिपूर्ण करणारे शिक्षक , हे आपले दुसरे गुरु. जीवनाचा आनंदी होण्याचा सोपा मार्ग म्हणजे चुकांच्या मुळाशी असलेले दोष दूर करणारे अध्यात्मिक गुरु. या सर्व गुरुंची कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा !
आताची तरुण पिढी नवनवीन तंत्रज्ञानामुळे गुरु या संकल्पनेला मुकत चाललेली आहे. वेगवेगळी ॲप , वेबसाइट्स हेच त्यांचे गुरू बनले आहेत. नवीन विकसित तंत्रज्ञानामुळे शिक्षक आणि पुस्तके नावाच्या गुरु या संकल्पनेला मुकत चालले आहेत. जरी तंत्रज्ञान कितीही विकसित झाले , तरी ते आई-वडील आणि शिक्षक यांची जागा घेऊ शकत नाही. सोलापूर जिल्ह्यातील रणजीत डिसले या शिक्षकाने " क्यूआर कोड " पद्धत क्रमिक पुस्तकांत २०१५ सालापासूनच सुरू केली आहे. तंत्रज्ञानाचे बाळकडू देणारे सर्व शिक्षक गुरुच आहेत. " टेक्नॉलॉजी " हा गुरु कसा होऊ शकतो. हे दुसर्या गुरुने शिकवण्याचे उत्तम उदाहरण आहे. बालरक्षक चळवळीच्या प्रणेत्या ठरलेल्या घाटकोपरच्या शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळेतील नुकत्याच निवृत्त झालेल्या शिक्षिका पुष्पलता मुळे यांनी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाची संधी देण्याचा प्रयत्न यशस्वी केला. स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक महिला शिक्षिका आज त्यांचा वसा आणि वारसा नेटाने पुढे नेत आहेत.
साध्या व नियमित विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवतातच , पण विशेष मुलांना शिकवणे हे मोठे दिव्य असते. मात्र , मालाडच्या जिजामाता विद्यालयातील ऋषीराज दुखंडे गेली अनेक वर्षे हे अशा मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. या विशेष मुलांत भाषा , भाव , शक्ती निर्माण करण्यासाठी दृकश्राव्य साधणे , चित्र , रंगीत कार्ड , आरसे , छायाचित्रे , प्रतिकृती , चित्रपट , दुरदर्शन संच इत्यादी साधने वापरली जातात. त्यामुळे असा शिक्षक म्हणजे स्वतःमध्येच एक " विशेष गुरु " असतो.
कोविडच्या विळख्यात अडकलेली ज्ञानगंगा आजच्या सर्वच गुरुजनांनी भागीरथ प्रयत्नांनी ऑनलाइन प्रवाहित करून " ऑनलाइन गुरु " हे बिरुद सार्थ केले आहे. कितीही वेगवेगळे ॲप , वेबसाइट्स उपलब्ध असले तरी गुरु शिवाय आपले जीवन अपूर्ण आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच म्हटले जाते , गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: , गुरुर्देवो महेश्वर: । गुरु: साक्षात परब्रम्ह , तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
- ज्ञानदेव हांडे, 8108321857
राज्य कार्याध्यक्ष - महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना.
Comments
Post a Comment